पुण्यातही अत्याधुनिक पशुरोग निदान प्रयोगशाळा

औंधमधील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत प्रस्तावित

पुणे – जनावरांपासून मनुष्याला होणाऱ्या घातक रोगांच्या विषाणूचे निदान करण्यासाठी आवश्‍यक बीएसएल-3 दर्जाची पशुरोग निदान प्रयोगशाळा (बायो सेफ्टी लेव्हल) लवकरच पुण्यातील औंध येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत साकारणार आहे. सुमारे 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च या प्रयोगशाळेसाठी अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने या प्रयोगशाळेच्या उभारणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, येत्या दीड वर्षांत ही प्रयोगशाळा घातक विषाणूंच्या निदानासाठी सज्ज होईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.

औंध येथे पशुसंवर्धन विभागाची पश्‍चिम विभागीय पशुरोग निदान संदर्भ प्रयोगशाळा (वेस्टर्न रिजनल डिसीज डायग्नोस्टिक लॅबोरेटरी-डब्लूआरडीडीएल) आहे. ही प्रयोगशाळा बीएसएल-2 दर्जाची असून, त्यामध्ये लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या अशा विविध रोगांमधील विषाणूच्या निदानाची सुविधा आहे.
महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य-प्रदेश, छत्तीसगड, गोवा ही पाच राज्ये आणि दादरा-नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशासाठी ही प्रयोगशाळा आहे.

मात्र, जनावरांपासून मनुष्याला होणारा ब्रुसेलोसिस, क्षयरोग, लेप्टोस्पायरोसिस, घोड्यांमधील विशिष्ठ आजार आदी रोगांमधील विषाणू निदानासाठीचे नमुने केंद्र सरकारच्या विविध केंद्रीय रोगनिदान संस्थांकडे पाठवावे लागतात. त्यातून भोपाळ येथे जी प्रयोगशाळा आहे, तेथे प्रामुख्याने हे नमुने तपासणीसाठी जातात. त्यांच्याकडे असलेले मनुष्यबळ आणि नमुन्यांचे “लोड’ यामुळे तेथून अहवाल मिळण्याला खूपच उशीर होतो. त्यामुळे महाराष्ट्रात ती प्रयोगशाळा असावी, या विचाराने पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारमार्फत केंद्राकडे बीएसएल-3 दर्जाची प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्याला राज्य सरकारनेही निधी देण्याला मंजुरी दिली आहे.

प्रयोगशाळेसाठी केंद्र सरकार 60 टक्‍के, तर राज्य सरकार 40 टक्‍के निधी देणार आहे. येत्या दीड वर्षांत प्रयोगशाळेची उभारणी पूर्ण होईल. त्या माध्यमातून घातक विषाणूचे आणि त्याच्या प्रकाराचे (स्ट्रेन) निदान पुण्यात शक्‍य होईल.

– डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्‍त आयुक्‍त, पशुसंवर्धन विभाग

कशी असेल ही प्रयोगशाळा

ही विशिष्ट प्रकारची प्रयोगशाळा असून, यामध्ये सॅंपलमधून बाहेर पडलेले विषाणू बाहेर जाऊन मानवाला घातक ठरू नये अशी सोय केलेली असते. प्रयोगशाळेत येणारी हवा आणि बाहेर जाणारी हवा ही फिल्टर होऊनच जाईल अशी सोय केलेली असते. शिवाय, सात विविध स्तरावर हे फिल्टर बसवलेले असतात. याशिवाय, तपासणीचे उपकरणही अत्याधुनिक पद्धतीचे असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.