पिंपरी – शहरातील मिळकतधारकांकडून मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात येणार आहे. थकबाकीसह मिळकतकर रक्कम एकरकमी भरल्यास मनपाकर शास्ती (दंड) रकमेत 70 ते 90 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव येत्या गुरुवारी (दि. 16) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. थकबाकीसह मिळकतकराची रक्कम जानेवारी 2022 अखेर भरल्यास 90 टक्के सवलत दिली जाईल. फेब्रुवारी अखेर भरल्यास 80 टक्के तर, मार्च अखेर भरल्यास 70 टक्के सवलत दिली जाणार आहे.
मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. शहरात पाच लाख 60 हजारांपेक्षा अधिक मिळकतधारक आहेत. ज्या मिळकतधारकांकडून वेळेत थकबाकी भरली जात नाही त्यांना महापालिका करसंकलन विभागाकडून नोटीस बजावण्यात येतात. नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मिळकत जप्तीची कारवाई करण्यात येते.
सद्य:स्थितीत मिळकत जप्तीची कारवाई न करता थकबाकी वसुलीसाठी मध्यममार्ग शोधत महापालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना दंड रकमेत सवलत दिली जाणार आहे. त्यानुसार त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेकडून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याबाबतची अंमलबजावणी केली जाईल.