बेल्हे -राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 27) जुन्नर तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे 34083 लाभार्थीना पोलिओचा डोस देण्यात आला. आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय नारायणगाव या ठिकाणी पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी शामचंद्र माळी उपस्थित होते. जुन्नर तालुक्यात एकूण 12 प्राथमिक आरोग्य केंद्र, 74 उपकेंद्र यांच्या अंतर्गत एकूण 353 ठिकाणी पोलिओ बुथचे नियोजन करण्यात आले होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकही लाभार्थी पोलिओ पासून वंचित
राहू नये, यासाठी आदल्या दिवशी ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी कामगार यांच्या मुलांना झोपडीत जाऊन पोलिओचे डोस देण्यात आले. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असे एकूण 806 कर्मचारी यांचा मोठा सहभाग घेण्यात आला होता.