नवी दिल्ली – इस्रायली दुतावासावळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनास्थळावर बॅटरीचे काही अवशेष सापडले आहेत. घटनास्थळ स्वच्छ करताना हे तुकडे सापडले. त्यामुळे या स्फोटासाठी टायमरचा वापर केला असल्याचे स्पष्ट होत आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या स्फोटासाठी लष्करी स्फोटकांचा वापर केल्याचे उघड होत आहे.
दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी सायंकाळी किरकोळ स्फोट झाला होता. प्राथमिक तपासात हा वाहनावरून येऊन दुभाजकांमधील फ्लॉवर पॉटमध्ये टाकला असावा असा कयास व्यक्त केला होता. मात्र, बॅटरीचे अवशेष सापडल्याने हा पूर्वनियोजित आणि अतिषय विचारपूर्वक आखलेला कट असल्याचे स्पष्ट होत असल्याचे वृत्त न्यूज 18 च्या संकेतस्थळावर दिले आहे.
न्यायवैद्यक अहवालाच्या प्राथमिक तपासणीत पेटन किंवा तशा स्वरूपाच्या उच्च दर्जाचे विध्वंसक असणाऱ्या स्फोटकांचा त्यासाठी वापर केला असावा. मात्र त्याचे नेमके स्वरूप लक्षात येण्यासाठी आणखी काही चाचण्या आवश्यक आहेत. सुरवातीला स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला असावा असा अंदाज होता. मात्र पेटनसारख्या स्फोटकाचा वापर झाला असल्यास याचे गांभीर्य वाढणार आहे.
या स्फोटासाठी निवडलेली वेळ महत्वाची होती. कारण सर्व पोलिस यंत्रणा बिटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमात गुंतलेली होती. त्यामुळे ही वेळ जाणीवपूर्वक निवडलेली असावी, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांनी हा स्फोट पॅरिस घटनेशी साधर्म्य असणारा असल्याचे सांगितले.
महत्त्वाचे दुवे मिळाले
दोन संघटनांनी या हल्ल्याची जबाबादारी समाज माध्यमांद्वारा स्वीकारली आहे. मात्र, तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा, असे मानले जात आहे. औरंगजेब रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातून काही महत्वाचे दुवे मिळाल्याचे सांगण्यात आले.