वॉशिंग्टन: चीनमधील उघ्युर आणि अन्य वांशिक अल्पसंख्यांकांविरोधातील दडपशाहीच्या कृत्यासाठी चीनला शिक्षा करण्यासाठीच्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या विधेयकामध्ये उघ्युर आणि वांशिक अल्पसंख्यांक गटाविरोधात हेरगिरी आणि त्रास देण्याच्या कारस्थानात सहभागी असलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याची तरतूद आहे.
चीनला शिक्षा करण्याच्या विधेयकात अमेरिकेतील संसदेने काही दुरुस्त्यांसह मंजुरी दिली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी बुधवारी यावर स्वाक्षरी केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ हे चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी हवाई येथे गेले असतानाच या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी झाली.
उघ्युर मानवाधिकार कायदा 2020 या नावाच्या या विधेयकानुसार उघ्युरांच्याविरोधातील मानवाधिकारांचा भंग करणाऱ्यास जबाबदार धरले जाणार आहे. चीनमध्ये अल्पसंख्यांक गटातील जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीतील छावण्यांमध्ये डांबण्यात आले आहे. या विधेयकामुळे चीन आणि अमेरिकेदरम्यानचे आगोदरच ताणले गेलेले संबंध आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे.