शिर्डी – रिपाई पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीरपणे ही इच्छा व्यक्त केली. आठवले यांनी या आधी या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. सन 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते.
भाजपच्या नेत्यांनी संमती दिली तर मला पुन्हा येथून निवडणूक लढवायला आवडेल असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शिर्डी हा राखीव मतदार संघ असून या मतदार संघातून सध्या सदाशिव लोखंडे हे भाजपयुतीचे विद्यमान खासदार आहेत. आठवले यांच्या विधानामुळे त्यांचे टेन्शन मात्र वाढणार आहे. शिर्डीत रिपब्लीकन पक्षाचे एक महा अधिवेशन घेतले जाणार आहे.
आमच्या पक्षाचे दोन आमदार नागालॅंड मधून विजयी झाले आहेत, तर महाराष्ट्रातून पक्षाचे आमदार का निवडून येणार नाहीत यावर या अधिवेशनात चर्चा केली जाईल असे ते म्हणाले. केवळ आपल्याला मंत्री केल्याने आपण समाधानी नाही तर आमच्या पक्षाच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात सत्तेची पदे मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्यासाठी त्यांनी आमच्या पक्षाला किमान दोन-तीन महामंडळांचे अध्यक्षपद दिले जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पक्षाला एक मंत्रीपद मिळावे, राज्यपाल नियुक्ती आमदारांमध्ये एक जागा मिळावी. लोकसभेच्या किमान तीन जागा आणि विधानसभेच्या पंधरा जागा मिळाव्यात अशा मागण्याहीं त्यांनी यावेळी केल्या.