पुणे – केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येत असतो. या योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना एक समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत. यामुळे गणवेश योजनेबाबत शाळा व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करता येणार नाही.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले व दारिद्रयरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. सन 2023-24 पासून दार्रिद्रयरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार करण्यासाठी आवश्यक त्या विभागाचे मार्गदर्शन घेणे, ई-निविदा प्रक्रिया राबविणे, सर्व संबंधिताचा समन्वय राखणे याकरीता उपाययोजना राखणे आदीबाबतची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. गणवेश स्काउड व गाईड विषयास अनुरुप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅंट किंवा हाफ पॅंट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळामध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची असा गणवेश मिळणार आहे. यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असणे आवश्यक आहे.
बचत गटांना काम देणार
दरम्यान गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून सहकार्य घेण्यात येणार आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. याबाबत शासनाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी आदेशही जारी केलेले आहेत.