निमोणे -करडे (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने खांब ओला होऊन विजेच्या खांबाच्या ताणामध्ये विद्युत प्रवाह उतरला. यामध्ये 15 मेंढ्या आणि 2 शेळ्यांना विजेचा धक्का बसला. यात त्या मृत्युमुखी पडल्या.
बाबा आबा कोळेकर (गोलांडे मळा, पाटस, ता. दौंड) असे नुकसान झालेल्या मेंढपाळाचे नाव असून त्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाबा कोळेकर हे पाटस येथून करडे परिसरात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आलेले आहेत.
मंगळवारी दिवसभर करडे परीसरात पावसाची रिपरिप सुरु होती. करडे-निमोणे रस्त्यावर एका व्यक्तीने प्लॉटिंग केलेले असून या प्लॉटिंगच्या चारही बाजूने लोखंडी तारांचे कंपाउंड आहे. या कंपाउंडच्या शेजारीच विजेचा खांब आहे.
दिवसभर पाऊस सुरू असल्याने या खांबावरील विद्युत प्रवाह ताणामध्ये उतरला. या विजेच्या खांबाच्या शेजारीच हे तार कंपाउंड असल्याने त्याजवळ चरणाऱ्या मेंढ्याना विजेचा धक्का बसल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. शिरुर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गोरख सातकर आणि डॉ. नवनाथ पडवळ यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.
विजेच्या खांबाच्या शेजारी तारेचे कंपाउंड असल्याने विजेचा प्रवाह तारेत उतरल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित मेंढपाळाला शासनाकडून शक्य तेवढी मदत केली जाईल.
-बाळासाहेब टेंगले, उपअभियंता महावितरण