पिंपळे गुरव – दापोडी येथील बुद्ध विहारजवळील नदी किनाऱ्यासमोर ईकरा शाळा, मदरसा बस स्टॉप येथे रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग केली जाते. त्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालक करत आहेत.
बस थांब्याच्या जवळच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी नागरिकांसह, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात एखाद्या वाहनचालकाने आडवी गाडी घातल्यास पूर्ण रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत आहे. बाजूने गाड्या असल्यामुळे वाहनांना मार्ग काढताना अडचण येत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दापोडीत या बस थांब्याच्या दोन्ही बाजूला कायमस्वरुपी अनधिकृतपणे वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे इतर वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करावी.
– लक्ष्मीकांत बाराथे, नागरिक.