पुणे, दि. 12 (डॉ. राजू गुरव) – धानोरी हा पुणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक 1 म्हणून ओळखला जातो. पण, येथे मुसळधार पावसामुळे नागरिकांना नेहमीच पुराचा फटका बसतो आहे. नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह अनधिकृत आणि सोयीप्रमाणे वळविण्यात आले आहेत. तेथे मोठ-मोठे बांधकाम प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याकडे कारवाईसाठी डोळेझाक केली जाते. यामुळे पूर परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान होते. महापालिका प्रशासनाची यंत्रणा कूचकामी ठरत असून पुराची समस्या कायमची सुटण्यासाठी नागरिकच धडपड करत आहेत.
धानोरी परिसरात पूर ही समस्या नित्याचीच बनली आहे. ऑक्टोबर 2021 रोजीच्या पुरातून सावरण्यासाठी नागरिकांना बऱ्याच दिवसांचा कालावधी लागला. तोच आता पुन्हा तशीच पुराची परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी भराव टाकून नाल्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. यामुळे पाण्याचे मुख्य प्रवाहच बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नाले तुडुंब भरतात व पाणी घरांमध्ये शिरते. लक्ष्मीनगर येथे “स्टॉर्म वॉटर लाइन’ टाकण्याचे कामही अर्धवटच आहे. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका प्रशासनाला यात अपयश आले. अधिकारी नुसतीच पाहणी करतात. समस्या मात्र काही सुटत नाही, अशी अवस्था आहे. पुराची समस्या निर्माण होत असलेल्या ठिकाणी मोठ्या व्यासाची स्टॉर्म वॉटर लाइन, ड्रेनेज लाइन टाकणे गरजेचे आहे. नाल्याची रुंदी व खोली वाढवून सीमाभिंतीची उंचीही वाढवायला पाहिजे. आपत्तीपूर्व व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका काहीच करत नाही.
राजकीय मंडळी, अधिकारी यांच्या वदहस्ताने संगनमत करून बांधकाम व्यावसायिकांनी नाले बुजविले आहेत. काही ठिकाणी नाले वळविले आहेत. अतिक्रमणेही झाली आहेत. पावसाच्या पुराचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिक, दुकानदार यांना बसतो. महापालिका हद्दीत धानोरी समाविष्ट होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, प्रभागातील समस्यांची स्थिती “जैसे थे’ आहे.
– शशीअण्णा टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते
लक्ष्मीनगर येथे 150 मीटरची स्टॉर्म वॉटर लाइन टाकण्याचे अर्धवट राहिलेले काम पावसाळ्यानंतरच पूर्ण करण्यात येणार आहे. पथ विभागाकडून मुख्य रस्ता खोदाईची आणि वाहतूक पोलिसांकडूनही परवानगी घेऊन उर्वरित 24 मीटरची लाइन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. महापालिका आयुक्तांचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्षात काम सुरू होईल.
– सिद्राम पाटील, कनिष्ठ अभियंता, मुख्य ड्रेनेज विभाग, मनपा