संधी पुन्हा द्या : बचत गटांनी पत्रकार परिषद घेत केली मागणी
बेलसर – महाराष्ट्र शासनाचे रास्त भाव शिधावाटप दुकाने परवाने मंजूर करण्यासाठीची कुठल्याही प्रकारची माहिती बेलसर (ता. पुरंदर) येथील महिलांना व बचत गटांना प्रशासनाकडून मिळाली नसल्याने काही ग्रामस्थ आणि महिला दुकानांच्या परवाना बाबतीत अनभिज्ञ होत्या. निविदा पुन्हा काढण्यात यावी व व सर्व बचत गटांना निविदा भरण्याची संधी पुन्हा प्राप्त व्हावी, अशी मागणी बेलसर येथील महिला बचत गटांनी केली आहे
बेलसर (ता पुरंदर) येथील आंबेडकर भावनांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आसमा मुजावर, वनिता जगताप, प्रियंका चव्हाण, सविता बुधे, अश्विनी जगताप, सुजाता हिंगणे, अन्नपूर्णा जगताप उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील 18 गावांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीतल्या निविदा 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान मागविण्यात आल्या होत्या; परंतु प्रशासनाने व संबंधित विभागाने कोणतीही प्रसिद्धी या निविदाच्या बाबतीत केले नाही. त्यामुळे बेलसर मधील बचत गट अनेक महिला बचत गट यापासून वंचित राहिल्या तर बेलसरमधील क्रांतीज्योती ग्रामसंघ बेलसर यांच्या एकूण 40 महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशासनाकडे त्यासोबतच जिल्हाधिकारी व पुरंदर तहसीलदार पुरंदर यांच्याकडे निविदा भरण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फेरनिविदा काढण्यासंदर्भात बेलसर मधील महिला बचत गटांच्या मार्फत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, खासदार सुप्रिया सुळे, तहसीलदार पुरंदर व जिल्हा अधिकारी पुरवठा शाखा यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांकडून देण्यात आली.
जिल्हाधिकारी, पुरवठा शाखा, पुरंदर तहसीलदार यांच्याकडे 26 ऑगस्ट रोजी मेलद्वारे तक्रारी अर्ज केला होता; परंतु त्या अर्जाची कोणतीच दखल खात्याने घेतलेली नाही.
– विजय गरुड, ग्रामस्थ
रास्त धान्य दुकानच्या निविदाची माहिती नोटीस लावून प्रसिद्ध केले होती. ग्रामस्थांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
– निलम कांबळे, तलाठी, बेलसर