उंब्रजकरांना प्यावा लागतयं गढूळ पाणी

ग्रामपंचायतीचे दुर्लक्षाने आरोग्याचा प्रश्‍न 

उंब्रज – ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गाळमिश्रित पाणी पुरवठा होत असून ग्रामपंचायतीचा जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित असतानाही नागरिकांवर दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे “गढूळाचं पाणी पावसाने ढवळलं, उंब्रजकरांच्या जीवाशी कोण खेळलं’ असच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावरील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या उंब्रज गावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मात्र त्याप्रमाणात येथील नागरी सुविधांमध्ये वाढ झालेली दिसत नाही. गावाला जलशुध्दीकरण (फिल्टर) ची योजना कार्यान्वित झालेली असली तरी आजही नागरिकांना नळांद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरुपाचा येत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेहमीच येतो पावसाळा याप्रमाणे पावसात नदीला येणारा पूर व त्या पुरामुळे येणारे गाळ मिश्रित पाणी हे उंब्रजकरांसाठी काही नवीन नसून पावसाळ्यात गाळयुक्त पाणी तर उन्हाळ्यात शेवाळयुक्त पाणी असे चित्र होऊन बसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुध्दा नागरिकांसह व्यापाऱ्यांवर विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. रोजच विकतचे पाणी पिणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहे. याकडे वेळीच ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांना शुध्द पाणी द्यावे, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे.

सध्या नदीलाच अतिशय गढूळ पाणी असून इंटक वेल मधून 50 टक्के शुद्ध पाणी वितरणच्या टाकीत यायला पाहिजे. मात्र ते येत नसल्याने वितरणच्या शुद्धीकरण यंत्रणेवर ताण येत आहे. परिणामी जलशुद्धीकरण करणाऱ्या वाळूतून पाणी फिल्टर होण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळेच गाळमिश्रित पाणी येत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे. येणाऱ्या गाळमिश्रित अशुद्ध पाण्याचा त्वरित बंदोबस्त करुन नागरिकांना शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करावा.

सुनील पाटील,  कराड उत्तर शिवसेना तालुकाप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)