पुणे – सहायक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या “यूजीसी नेट’ डिसेंबर आणि जून सत्रासाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. “यूजीसी नेट परीक्षा’ 6 ते 11 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) “यूजीसी नेट’ परीक्षा घेतली जाते. यासंदर्भात “एनटीएने’ परिपत्रक प्रसिद्ध करीत नेट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार परीक्षेसाठी अर्ज करण्याचा कालावधीही वाढवून देण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल त्यांच्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत लिंक खुली असेल. 6 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्जामध्ये बदल करण्यासाठी 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत लिंक खुली असणार आहे, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे. यापूर्वी यूजीसी नेट परीक्षा मे 2021 ला होणार होती. पण करोनामुळे ती स्थगित करावी लागली. यानंतर यूजीसीने डिसेंबर आणि जून सत्र एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता.
यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील महाविद्यालयआणि आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून अर्ज करता येतो.