मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत एक ऑगस्ट रोजी अटक केली असून ते कोठडीमध्ये आहेत.
उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने, त्यांना भेटायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशाच पद्धतीने उद्धव यांना संजय राऊतांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांनी तुरुंग प्रशासनाला कोणतेही लेखी निवेदन दिले नव्हते. उद्धव यांच्या तर्फे एका व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र तुरुंग अधीक्षकांनी राऊत यांना भेटायच असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले.