इस्लामाबाद – पाकिस्तानच्या दोन मच्छिमार नौका अरबी समुद्रामध्ये बुडाल्या आहेत. या नौकांवरील 10 मच्छिमार बेपत्ता झाले आहेत. सिंध प्रांतातील या मच्छिमारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या नौका सिंध प्रांताच्या किनारयाजवळच्या थाता भागाजवळ समुद्रामध्ये बुडाल्या आहेत, असे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अल सिद्दीक आणि अल बहारी या दोन मच्छिमार नौकांवर डझनभर मच्छिमार होते. इब्राहिम हैदरी येथून या नौका मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेल्या होत्या. या नौकांवरील अंदाजे 25 मच्छिमारांना सागरी सुरक्षा दलाने वाचवले आहे. मात्र अजूनही 8 मचिछमार बेपत्ता आहेत, असे पाकिस्तान फिशर फॉक फोरमच्या प्रवक्त्याने सांगितले. थत्ताच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या 8 मच्छिमारांच्या शोधाचे काम सुरू आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
सोसाटाचा वारा आणि प्रमाणापेक्षा अधिक भार असल्यामुळे या नौका समुद्रात बुडाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.