सोमाटणे – पुणे-मुंबई द्रुतगतीवर शिरगाव हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 23) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
शेख अब्बास महमूद मौलाअली (वय 30, रा. विनोबा भावेनगर, पाईप रोड, कुर्ला, मुंबई) आणि अबू बकर कुरेशी (वय 35, रा. साकीनाका, मुंबई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मौलाअली आणि कुरेशी हे दोघे पिकअप टेम्पोने (एम. एच. 48 /ए.जे./3634) मंगळवारी सकाळी मुंबईकडे निघाले होते. काही कारणास्तव शिरगाव हद्दीत ते खाली उतरले.
मात्र टेम्पोपासून 300 ते 400 मीटर अंतरावर पायी असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अज्ञात वाहन चालक विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार बी. आर. जगदाळे तपास करीत आहेत.