पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्याची व्याप्ती वाढल्याने आता पुण्यासाठी दोन सह धर्मादाय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली असून, ढोले-पाटील रस्त्यावरील धर्मादाय कार्यालयात आता दोन सह आयुक्त बसणार आहेत.
धर्मादाय पुणे विभागाचा व्याप आणि विस्तार वाढल्याने आता पुणे विभागासाठी पूर्वी एक आणि त्याचबराेबर आता आणखी एक सहआयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन सह-आयुक्त पदावर पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयाचे उपायुक्त राहुल मामू यांची पदोन्नती होऊन सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील धर्मादाय कार्यालय हे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत पुणे, सातारा, नगर आणि साेलापूर हे चार जिल्हे येतात. याआधीच्या सह आयुक्तपदी येथे सुधीरकुमार बुक्के आहेत. आता त्यांच्याबरोबरीने मामू हेदेखील असणार आहेत.
दोन सह धर्मादाय आयुक्त असल्याने दोघांमध्ये जिल्हे वाटून देण्यात आले आहेत. या नियोजनातून मध्ये बुक्के यांच्याकडे पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा, तर मामू यांच्याकडे नगर व साेलापूर या जिल्ह्यांचा कार्यभार असणार आहे.
त्याचप्रमाणे सहायक आयुक्त राजेश परदेशी यांचीही पदोन्नती होऊन त्यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विधी आणि न्याय विभागाच्या अधिनस्त धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ, तसेच उपआयुक्त, गट-अ या संवर्गातील बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत.