नागपूर – मुंबईपाठोपाठ आता राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही सोने तस्करी (smuggling gold) होत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विमानतळावर (Nagpur airport) सीमाशुल्क विभागाने आज सकाळी दोघांना अडीच किलो सोन्यासह सुमारे 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मो. शाहिद नालबंद, पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवाशी आहेत. सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
कतार एअरवेजमधून दोन जण सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर सापळा रचला.
फ्लाइट लॅंड होताच कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना थांबवले आणि एका खोलीत नेऊन त्यांची झडती घेतली. दोघांकडून अडीच किलो सोने सापडले.
कस्टम विभाग या दोघांची चौकशी करत आहे. दोघांकडून मोबाइल, पासपोर्ट आणि सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही मोबाइलचे सीडीआर काढले जात आहेत. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
या प्रकरणाचा तपास कस्टमने एसआयबीकडे सोपवला आहे. कस्टमचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.