बिटकॉईन अकाउंटमध्ये जेवढे पाठवाल त्याच्या दुप्पट डॉलर परत देण्याचे फसवे आश्वासन
न्यूयॉर्क -अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासह काही महत्वाच्या व्यक्तींचे ट्विटर अकाउंट बिटकॉइन घोटाळ्यासाठी हॅक करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांचेही ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हे सर्व फसवे ट्विट नंतर डिलीट केले गेले.
हा पूर्ण संगनमत करून केलेला “सोशल इंजिनिअरींग’ हल्ला असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.आपल्या काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून ट्विटरच्या इंटरनेट सिस्टीम आणि टूल्सचा वापर करण्याची संधी मिळवून काही लोकांनी हा हॅकिंगचा उद्योग केला असल्याचे ट्विटर सपोर्ट टीमने म्हटले आहे.
हॅक झालेल्या ट्विट अकाउंटवरून काही बनावट मेसेज पोस्ट केले गेले आहेत. एका अज्ञात बिटकॉइन पत्त्यावर डॉलर पाठवावेत. त्यातील प्रत्येक 1,000 डॉलर मागे 2000 डॉलर परत देण्याची बनावट ऑफर या ट्वीटद्वारे केली गेली. बिटकॉईनच्या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहाराचाच भाग म्हणून हा बनावट मेसेज पाठवला गेला होता. एकदा हे पैसे बिटकॉईनमध्ये पाठवले गेले की ते परत मिळवता येऊ शकत नाहीत. म्हणून अशा आर्थिक गैरव्यवहारांसाठी बिटकॉईनचा सर्रास वापर केला जातो.
ओबामा, कॅनिए वेस्ट, किम कार्दशियन वेस्ट, वॉरेन बफे, बेझोस आणि माईक ब्लूमबर्ग यांच्यासह इतरांच्या खात्यांवरूनही त्यांच्या प्रोफाईलवर बिटकॉईनच्या माध्यमातून देणग्यांचे आवाहन करणारी अशीच पोस्ट केली गेली आहे.
या सर्व अकाउंटवर एकच बिटकॉईन ऍड्रेस दिलेला आहे. या बिटकॉईन वॅलेटमध्ये गेल्या काही तासांमध्ये 1,12,000 डॉलर जमा झाले आहेत. हा निधी बेशिस्त वापरकर्त्यांनी अथवा स्वतः घोटाळेबाजांनीच जमा केला हे समजू शकलेले नाही. प्रत्येक जण बिटकॉईनमध्ये जमा केल्यानंतर 30 मिनिटांनी प्रत्येक डॉलरच्या दुप्पट डॉलरची मागणी करायला लागला आहे. आता हे डॉलर परत देण्याची वेळ आली आहे, असे बिल गेटस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या निवडणूक प्रचाराला या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. प्रचारासाठीचा निधी म्हणून त्यांच्या समर्थकांनी या ट्विटच्या आधारे निधी संकलनाला सुरुवात केली होती. मात्र नंतर हे अकाउंटच डिलीट करून टाकण्यात आले.
ट्विटरवर ओढवली नामुष्की…
जेंव्हा हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तेंव्हा सर्व प्रभावित ट्विट अकाउंट लॉक केली गेली आणि सायबर अटॅक करणाऱ्यांची सर्व ट्विट डिलीट केली गेली. त्यानंतर मूळ ट्विटर मालकांनाच या अकाउंटचा संपर्क करण्याची सुविधा करून देण्यात आली, असे ट्विटरने स्पष्ट केले गेले आहे. या सर्व प्रकार आमच्यासाठी धक्कादायक आहे. याचा तपास करून ही माहिती सर्वांना दिली जाईल, असे ट्विटरचे मुख्य कार्यकारी जॅक डोर्सी यांनी सांगितले.