वाघोली : पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना व दुकानदारांना दम देणे, मारहाण करून दहशत पासरविणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या आहेत. बाईफ रोड परिसरातील जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद आनंद सपकाळ (वय, २४) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाईफ रोड परिसरातील व्हाइटस्टोन सोसायटीमध्ये राहणाऱ्या हर्षद सपकाळ हा स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बाईफरोड परिसरातील दुकानदार, नागरिकांमध्ये लॉकडाऊनच्या अनुषंगाने दहशत निर्माण करीत होता.
त्याच्या चारचाकी सेलेरीओ (एमएच १५ आरजी ९२३२) गाडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची टोपी व काठी असल्याने नागरिकही त्याला घाबरत होते. त्याचबरोबर तो काही दुकानदारांकडून पैसे न देता साहित्य नेत होता. आठवडाभरापासून असे प्रकार सुरु असल्याने स्थानिक तरुणांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात कार व अधिकाऱ्याबाबत चौकशी केली असता असा कोणताही अधिकारी कार्यरत नसल्याचे समजले.
तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतः याबाबत माहिती घेऊन काही पोलीस त्याच्यामागावर ठेवले होते. पोलीस कर्मचारी समीर पिलाणे, दत्तात्रय काळे, बाळासाहेब तनपुरे यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडले. त्याच्याकडील पोलीस अधिकाऱ्याची काठी, टोपी व गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.
तोतया पोलीस अधिकाऱ्यावर यापूर्वीच नाशिक व जालना येथील बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिकारी असल्याचे सांगून फसवणुकीचे प्रकार केले असल्यास त्यांनी लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.