पुणे – करोनाच्या जागतिक साथीतून सावरत बहुतेक क्रीडाप्रकारांचे वेळापत्रक पूर्ववत सुरू झाले असताना पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले हा सुद्धा सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. थायलंडमधील क्रॉसकंट्री रॅली मालिकेद्वारे तो कारकिर्दीचा नव्याने प्रारंभ करेल. येत्या शनिवारी-रविवारी ही रॅली होत आहे,
थायलंडमध्ये संजयने बरेच यश मिळविले आहे. त्यामुळे पुनरागमनासाठी त्याने याच देशाची निवड केली. याआधी 2019 मध्ये त्याने थायलंडमधील कांचनाबुरी येथील रॅलीत भाग घेतला होता. त्यावेळी इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे त्याला रॅली पूर्ण करता आली नव्हती.
यावेळीही संजयने डेलो स्पोर्टस संघाशी करार केला आहे. थायलंडचा थान्याफात मिनिल त्याचा नॅव्हीगेटर असेल. संजयने 2018 मध्ये त्याच्या साथीत थायलंड रॅली मालिकेत भाग घेतला होता. त्यावेळी चार फेऱ्यांच्या मालिकेत मिनील याला नॅव्हीगेटरचे विजेतेपद मिळाले होते.
यंदाच्या मोसमात या मालिकेतील पहिली फेरी पॅकॉंग नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या चाचाएंगासाओ प्रांतात होईल. तेथे प्रारंभ झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांचनाबुरी शहरात मालिकेची सांगता होईल. संजय टकले 2018 मध्ये जागतिक रॅली मालिकेत (डब्लूआरसी) भाग घेणारा पहिला नोंदणीकृत भारतीय स्पर्घक बनला.