हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा संगीत महोत्सव व पुरस्कार वितरण संपन्न
हडपसर – हडपसर परिसरातील समाजाची सांस्कृतिक वैचारिक भूक भागवण्याचे काम हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने केले जात आहे. आज माझ्या हस्ते दिला जाणारा ‘त्रिनेत्र’ पुरस्कार म्हणजे मानवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. समाजात विचारधारा नसेल तर समाज अनियंत्रित असतो विचारधारा समाजाचे मन आणि मनगट मजबूत करते, आजचे पुरस्कारार्थी समाजाला मानवता आणि विचारधारा देणारे असून ते खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती असून ते राष्ट्र उभारणीचे काम करत आहेत असे गौरव उद्गार शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षे कला, नृत्य, संगीत याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम वैविध्यपूर्णपणे आयोजित केले जातात. दिवाळी पहाट संगीत महोत्सव हा एक उपक्रम रमा एकादशी ते भाऊबीज पर्यंत आयोजित केला जातो. या मध्ये महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी पंडित उपेंद्र भट यांचे संतवाणी, जेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचे फिटे अंधाराचे जाळे…शास्त्रीय गायक अजित कडकडे यांचा कैवल्याच्या चांदण्याला, लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आठवणी, रमा कुलकर्णी, मालवीका दीक्षित, राहुल जोशी, अजित विसपुते, आयुष्यावर बोलू काही सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि आज अवघा रंग एक झाला कु. अंजली व कु. नंदिनी गायकवाड या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रतिष्ठानच्यावतीने हडपसर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कै . बाबुराव श्रीपती तुपे व कै . अशोकराव बापूसाहेब मगर यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठान सामाजिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रातील नामवंतांचा अलौकिक कार्याबद्दल ‘त्रिनेत्र’ कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते ‘त्रिनेत्र ‘ कृतज्ञता पुरस्काराने जेष्ठ विचारवंत, साहित्यिक व निर्भीड वक्ते प्रा. हरी नरके व शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष व समाजसेवक बच्चूसिंग टाक यांना सन्मानित करण्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मगर यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रा. हरी नरके यांनी पुरस्काराला उत्तर देताना महात्मा फुले यांची हडपसर येथे शेती होती. तिथे त्यांनी शाळाही काढली होती. १८५४ साली त्यांनी मराठीतले पहिले आधुनिक सामाजिक नाटक लिहिले.त्याची ३ हस्तलिखिते मिळाली. त्यातल्या दोनवर तृतीय रत्न हे नाव होते तर एकावर तृतीय नेत्र. हडपसरला शेतावर लिहिलेल्या नाटकाचे नाव असलेला हा पुरस्कार. मी याच भागात लहानाचा मोठा झालो, शिकलो. ज्या परिसराने जडण घडण केली तेथील हा घराचा पुरस्कार असल्याने त्याचे मोल मोठे असल्याची भावना व्यक्त केली.
समाजसेवक बच्चूसिंग टाक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी आमदार चेतन तुपे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, श्रीनाथ भिमाले,नगरसेवक योगेश सासणे, डॉ. शंतनू जगदाळे , प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रजाक मगर, खजिनदार रामदास तुपे, सचिव नाजीम शेख आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले. तर आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश तुपे यांनी मानले.