नगर – अवतार मेहेरबाबा 4 मे 1923 रोजी प्रथम अरणगावला प्रथम आले होते. ते ठिकाण आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे. आज (दि. 4) त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मेहेरबाबा ट्रस्ट विश्वस्त डॉ. मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली.
दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी जगातून व देशातून मेहेरप्रेमी येणार आहेत. उद्या (गुरुवार) बाबा प्रथम लिंबाच्या झाडाखाली बसले तेथे सकाळी 9 ते 12 वा. कार्यक्रम होणार आहे. यामध्ये स्वागत, भजने व श्रीधर केळकर व जाल दस्तूर माहिती देतील. तेथून समाधीपर्यंत पदयात्रा होणार आहे. दुपारी 4 ते रात्री 8पर्यंत समाधी स्थळी कार्यक्रम होणार असून, यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष फलू मिस्तरी यांचे प्रवचन, भाऊ कलचुरीलिखित भजने,गाणे नगर सेंटर व इतर सेंटर सादर करणार आहेत. तसेच व्याख्यानेही होणार आहेत. शेवटी “मेहेराबाद दि बिगनिंग’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
शुक्रवारी (दि. 5) सकाळी 9 ते 12 पर्यंत भजन, सॉंग, लघुनाटिका,माहितीपट, व्याख्याने नगर, पुणे, आंध प्रदेश, मुंबई, दिल्ली येथील केंद्र, तसेच परदेशातील कॅनडा येथील टोरांटो केंद्र, ऑस्ट्रेलिया येथील अबोड केंद्र सादर करतील. दुपारी 4 ते रात्री 8पर्यंत दर्यापूर येथील सेंटर कव्वाली, सिद्धार्थ वर्मा ग्रुप गजल, गोपाळकृष्ण व अजित सोनी हे भजने सादर करतील. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील हरिराम व पार्टी बॅंड पथक बॅंड वाजवतील. रात्री शेवटी फिल्म, भजन आरती व प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.