राजगड, (वार्ताहर) – पाबे (ता. राजगड) येथे वादळी वार्यासह बुधवारी (दि. 22) अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने गावातील अंगणवाडीचे छत उडाले असून इमारतीचे कॉलम देखील जमीनदोस्त झाले आहेत. तसेच शाळेचे स्वच्छतागृह, टाकी व छतावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वार्याचा वेग इतका प्रचंड होता की वर्गखोलीवरील पूर्ण छत अँगलसह जवळच असलेल्या 50 फूट उंच वडाच्या झाडावर जाऊन लटकले असल्याचे दिसून आले. तसेच गावातील घरावरील पत्रे उडून गेले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ढगफुटी सदृशपावसामुळे गावातील ओढे आणि नाल्यांना पूर आला असून लिंबारवाडी व गावठाण यांना जोडणारा मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गावाशी संपर्क तुटला आहे.
शाळेच्या दोन वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झालेल्या असून त्यांची डागडुजी अथवा दुरुस्ती न करता नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करून मिळावे अशी मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा जीर्ण झालेल्या भितींमुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
वादळी वारा आणि ढगफुटीसदृश पावसामुळे गावातील अंगणवाडी, शाळा, घरे आणि विजेचे खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्याची तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. -ज्योती रेणुसे, सरपंच, पाबे
महसूल प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून संबंधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. – राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर
शाळेच्या दोन वर्गखोल्या अत्यंत धोकादायक असून त्याच्या भिंती अत्यंत जीर्ण झालेल्या आहेत. त्या वर्गखोल्या कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. या दुरुस्तीसोबतच तातडीने नवीन 2 वर्गखोल्या बांधून मिळाव्यात. शाळा बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. – गणपत रेणुसे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती पाबे.