बारामती/जळोची, (प्रतिनिधी) – वाहनांना काळ्या फिल्म लावून अनेक उद्देशांनी गाडी आतून झाकून ठेवणार्या वाहन चालकांना बारामती वाहतूक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत राबविलेल्या विशेष मोहिमेत काळ्या काचा करणार्या 125 जणांना वाहनांना 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
याव्यतिरिक्त काळ्या फिल्मसोबत 2 दिवसांत विना क्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट्स, अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल बसून टुकार गिरी करणे, पोलिसांचे आदेश न पाळता निघून जाणे अशा 145 वाहनांवर सुद्धा कारवाई करून 93 हजार 400 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
काळ्या काचा करून गाडीत कोणत्याही कामासाठी दुरुपयोग होऊ शकतो, अवैध पदार्थांची वाहतूक होऊ शकते त्यामुळे नियमभंग करणार्या अनेकांची गय न करता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. काळ्या काचा लावू नये असा नियम असतानाही अनेकांकडून नियमांची पायमल्ली होते.
बेकायदा कृत्य करणा-यांचा काळ्याकाचा करण्याकडे जास्त कल आहे हे आढळून आले आहे. बारामती वाहतूक पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. विशेष म्हणजे आर्थिक दंड करूनही काहीजण काचांवरील फिल्म्स काढत नाहीत, अशावेळी स्वतः पोलिसांनी या फिल्स काढण्याची कारवाई हाती घेतली आहे.
गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वाहणांच्या काचा काळ्या करण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार पुढे येत आहेत.अनेकवेळा अमली पदार्थांची चोरटी वाहतूक, अपहरण, चोरीसारख्या घटनामध्ये तसेच इतर गुन्हेगारी घटनांमध्ये काळ्या काचेची वाहने वापरण्यात येतात.त्यामुळे अशी वाहने आढळून आल्यास कारवाई केली जाईल. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
मार्च ते 18 मे पर्यंत पोलिसांनी केलेली कारवाई
महिना…वाहनांवर कारवाई….वसूल दंड (रुपये)
मार्च…33….31 हजार 500
एप्रिल…63….66 हजार 500
18 मेपर्यंत… 29…26 हजार 500