जेजुरी, (वार्ताहर) – जेजुरी नगरपालिकेच्या वतीने खोमणे वस्तीनजीक मोरगाव ते टेलिफोन भवन या रस्त्याचे काम गट क्र.178 मधून होत असून सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचे काम बेकायदा असल्याचे व जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याची तक्रार अॅड. विजया नाझीरकर व अॅड. वसंत नाझीरकर यांनी केली असून याबाबत सासवड न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या वकील दांपत्याने सांगितले की, गट न.178 ही मिळकत सुमारे 12 वर्षांपूर्वी आम्ही खरेदी केली होती; मात्र ही जागा नगरपालिकेच्या ताबा -वहिवाटीत नसतानाही तसेच सरकारी मोजणी न करता कागदपत्रांची शहानिशा न करता 2021-2022 दरम्यान जिल्हाधिका-यांना चुकीची दिशाभूल करणारी माहिती व कागदपत्रे सादर करत व ही जागा नगरपालिकेच्या मालकीची दाखवून रस्त्याचे कामाची मंजुरी मिळवत सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू करण्यात आले असून याबाबत सासवड न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले म्हणाले की, या रस्त्यासाठी जिल्हाधिका-यांची प्रशासकीय मान्यता घेतली आहे. लेआउट, टेंडर निविदा, वर्कऑर्डर आदी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर जानेवारी महिन्यात काम सुरू केले होते; मात्र वकील दाम्पत्याने हरकत घेतल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत नगरपालिका कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.
मात्र, हरकतदारांचे समाधान झाले नसावे काम सुरू करण्यापूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्यानंतर काम सुरू केले आहे. हरकतदारांनी न्यायालयात याचिका दाखल करीत रस्त्याचे कामाला स्थगिती मागितली आहे; परंतु त्यांना अद्यापपर्यंत स्थगिती आदेश मिळालेला नाही. न्यायालय जो निर्णय देईल त्याचा नगरपालिका प्रशासनाकडून आदर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.