शिरगाव (वार्ताहर) – थुगावच्या नवीन पुलाचे बांधकाम अडीच वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीकरिता खुला केला आहे. पावसाळ्यापूर्वी पूल सुरू झाल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वशील असलेला हा पूल चाळीस वर्षानंतर नव्याने उभारण्यात आला. दोन वर्षांचा कालावधी असलेल्या या पुलाचे काम सहा महिने मुदत वाढ घेऊन अडीच वर्षांत पूर्ण केला. पुलामुळे दोन गावांमधील अंतर कमी झाल्याने वाहतुकीलाही आता निर्बंध राहणार नाही. पुलाची क्षमता वाढल्याने अवजड वाहनांना कुठलीच अडचण भासणार नाही.
थुगाव पूल हा आसपासच्या गावांकरिता दळण वळणासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. यामुळे अनेक गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. थुगाव पुलाजवळील गावातील लोकांचे जीवनमान पूर्णतः शेतीवरच अवलंबून आहे. गावातील बागायत क्षेत्र, दुग्धव्यावसायिक व इतर नव्याने आलेले छोटे मोठे व्यावसायिक या लोकांसाठी पूलमहत्त्वाचा ठरणार आहे.
पुलाचे पावसाळ्याच्या चार महिने अगोदरच काम पूर्ण झाल्याने बऊरवाडी, थुगाव, आर्डव, कोथुर्णे, सडवली, शिवणे गावांतील प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत वाहतूक होणार आहे.
पुलाची माहिती
■ लांबी – ७९.०० मीटर
■ रुंदी – ७.५० मीटर
■ उंची – ५.०० मीटर
■ एकूण किमत : १३ कोटी ३० लाख
■ कामाचा कालावधी : २ वर्षे (वाढीव मुदत सहा महिने काम पूर्ण)