दौंड, पुणे – फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरूणांचा दौंड नगरपालिकेच्या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. असरार अब्दूल अलीम काझी (वय 21), करीम अब्दूल हादी काझी (वय 20) आणि अतिक उझजमा फरीद शेख (वय 20, तिघे रा. नवगिरे वस्ती, नगर मोरी, दौंड) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही रविवारी दुपारी चार वाजता एका दुचाकीवरून दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नगरपालिका साठवण तलाव परिसरात फोटोशूट आणि पोहण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजले तरी तिघे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिघे तलावावर पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. तलाव परिसरात पाहणी केली असता तलावातील विहिरीच्या कडेला त्यांची दुचाकी, बॅग व कपडे आढळून आले.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली. पाण्यात गाळात त्यांचे मृतदेह अडकलेले होते. रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांचे दौंड उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मृत असरार व करीम काझी हे सख्खे चुलतभाऊ होते तर अतिक शेख हा काझी यांचा शेजारी राहणारा मित्र होता. असरार हा कला शाखेचा पदवीधर असून नोकरी करीत होता. तर करीम आणि अतिक हे पुणे येथील महाविद्यालयात संगणक विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होते.