बीएमसीसी महाविद्यालयासमोर प्रायोगिक तत्त्वावरील आखणी
पुणे – येथील बीएमसीसी महाविद्यालयासमोर शुक्रवारी रात्री शहरातील पहिले झेब्रा क्रॉसिंग आखण्यात आले आहे. पादचारी तसेच नागरिकांत वाहतूक नियमांची जागृती करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. या उपक्रमाची उपयुक्तता तसेच त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शहरात असे झेब्रा क्रॉसिंग साकारण्यात येणार आहेत.
पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी वर्दळीचे मुख्य चौक, तसेच मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग आखण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत वेगाने वाहने चालवतात. तर वाहने झेब्रा क्रॉसिंगवर थांबत नसल्याने अपघाताचा धोका असल्याने नागरिकही त्याचा वापर न करता जागा मिळेल तिथून रस्ता ओलांडतात. परिणामी अपघातासह, वाहतुकीवरही त्याचा परिणाम होतो.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने थ्री डी झेब्रा क्रॉसिंगची संकल्पना राबविली आहे. वाहतूक पोलिसांकडून या पूर्वी येरवडा येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात अशा प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग रेखाटण्यात आले आहेत.
पादचारी तसेच वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासह या थ्री-डी झेब्रा क्रॉसिंगमुळे वाहनचालक वाहने सावकाश चालवतील तसेच पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडणेही शक्य होईल. या उद्देशाने ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुख, मनपा