सागर,- मकरसंक्रांतीनिमित्त सुमारे साडे तीन लाख भाविकांनी आज गंगा आणि बंगालच्या उपसागराच्या संगमाच्या ठिकाणी स्नान केले. यावेळी भाविकांची आरटीपीसीआर चाचणी करूनच त्यांना त्यांच्या गंगा स्नानास अनुमती देण्यात आली.
ज्यांनी करोना लसीचे दोन डोस घेतले त्यांनाच येथे अनुमती देण्यात आली. काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली होती. कडाक्याची थंडी असूनही भाविकांच्या मोठ्या गर्दीवर त्याचा काही विपरित परिणाम झाला नाही. त्याच परिसरात कपिल मुनींचे मंदिर आहे तेथेही भाविकांची गर्दी झाली होती.
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे गंगा स्नान होत असल्याने तेथे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नागरी संरक्षण दल, पोलिस व स्वयंसेवकांची पथके ठिकठिकाणी दक्षतेसाठी कार्यरत ठेवण्यात आली होती. हा स्नान सोहळा शनिवारी सकाळी सहा पर्यंत सुरू राहणार आहे. त्याची पर्वणी आज पहाटे 6 वाजून 2 मिनीटांनी सुरू झाली.
कोलकाता हायकोर्टाने या घाटावर कोविडविषयक दक्षता घेतली जात आहे की नाही याची पहाणी करण्यासाठी दोन सदस्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. या पथकाने ठिकठिकाणी जाऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.