नवी दिल्ली : काळ्या गॉगल मधून भेदक जाणारी नजर, चेहऱ्यावर आणि व्यक्तिमत्वात दिसणारा आत्मविश्वास आणि अंगावर असलेला तो भारतीय वायू दलाचा युनिफॉर्म.
ती सारथ्य करते तब्बल ६२ मिलियन अमेरिकन डॉलर इतकं मूल्य असलेल्या आणि भारताच्या भात्यातील अग्रणी फायटर जेट सुखोई एम.के.आय.३० या लढाऊ विमानाचं.
अवनी चतुर्वेदी, १२ ते २६ जानेवारी दरम्यान जपानच्या ह्याकुरी हवाई तळावर जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (JASDF) या भारत आणि जपान च्या संयुक्तिक मेगा हवाई लढाऊ सरावात सहभागी झालेल्या भारतीय वायू दलाचा भाग होती. या सरावात हवाई लढाऊ युक्ती, इंटरसेप्शन आणि हवाई संरक्षण मोहिमांवर लक्ष केंद्रित केले गेले.
अवनी आपल्या आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासातील अनुभवावर म्हणाली,”युद्धाअभ्यासात सहभागी होणे हा नेहमीच महत्त्वाचा अनुभव असतो. विशेषत: जर ते परदेशी हवाई दलासह असेल. विशेष म्हणजे यावेळी मी त्याचा एक भाग होते. माझ्यासाठी ही एक मोठी संधी होती आणि शिकण्याचीही मोठी संधी होती. या कारणास्तव, मी सर्व तरुण, इच्छुक मुली आणि मुलांना सांगू इच्छिते की तुमच्यासाठी आकाश ही मर्यादा आहे.
भारतीय हवाई दल हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे आणि लढाऊ विमाने उडवणे खरोखरच रोमांचक आहे. मी भारतीय वायुसेनेच्या सर्व इच्छुकांना सांगू इच्छिते की, तुम्ही लक्ष्यावर लक्ष ठेवा आणि दृढनिश्चयाने पुढे जा..असे अवनीने म्हटले.
अजूनही कोणाला भारतीय नारीच मुल्य आणि प्रतिभा चूल आणि मूल किंवा साडी आणि कुंकू इथपर्यंत मर्यादित जाणवत असेल तर त्यांनी आपल्या डोळ्यावरची झापड काढून अवनीकडे बघण्याची गरज आहे.