करोना लसींवरच चोरांचा डल्ला; सरकारी रुग्णालयातून 320 डोसची चोरी

जयपूर  – राजस्थानमध्ये करोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असताना आता एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातून चक्क करोना प्रतिबंधक लसींची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजमधून बुधवारी भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्‍सिन लसींच्या 32 वायलची चोरी झाल्याचे समोर आले आहे. एका वायलमध्ये 10 डोस असतात आणि अशा प्रकारे एकूण 320 डोसेसची चोरी झाली आहे. या प्रकरणी रुग्णालयाकडून शास्त्री नगर पोलीस ठाण्यात वॅक्‍सिन चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोना प्रतिबंधक लस 12 एप्रिल रोजी गायब झाल्या होत्या. दोन दिवसांनंतर आज सकाळी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, भारत बायोटेकने निर्मित कोवॅक्‍सिनच्या 32 वायल हरवल्या आहेत. या प्रकरणात रुग्णालयाकडून चूक झाली आहे की लस सीएमएचओ कार्यालयातून वाहतूक करताना गहाळ झाली आहे, हे अद्याप माहिती नाही.
या प्रकरणी रुग्णालयाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. जर रुग्णालयातील एखादा कर्मचारी यामध्ये सहभागी असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती लसीकरण केंद्राचे नोडल अधिका-यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.