गुजरातच्या सूरतमध्येही करोनाचा कहर; स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार

सुरत – गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये करोनाच्या प्रकोपामुळे हाहाकार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत.

यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की, चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली असल्याची बातमी काही वाहिन्यांवरून देण्यात आली आहे. अन्य काही जिल्ह्यांत थोड्याफार फरकाने हीच स्थिती असल्यामुळे गुजरातमध्येही लॉकडाऊन केले जाण्याची शक्‍यता आहे.

आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मात्र स्थानिक प्रशासनाने जर असा निर्णय घेतला तर त्याला आमचे समर्थन असेल असे गेल्याच आठवड्यात या राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सांगितले आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत, हे भीषण वास्तव आहे.
स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत काम करत असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दिवसाला आमच्या स्मशानभूमीत 20 मृतदेह येत असत.

यापैकी काही मृतदेहांना लाकडांवर अग्नी दिला जात असे. तर उर्वरित मृतदेहांचा दाहसंस्कार विद्युतदाहिनीमध्ये होत असे. सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला 80 मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. 

आम्ही थोडाथोडावेळाने प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर करत असलो तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे की, या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्याची माहिती रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील अधिकाऱ्याने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.