नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाला सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. यामध्ये ओमायक्रॉनमुळे काही प्रमाणात मुदतवाढ देण्याची मागणी बऱ्याच करदात्यांनी सरकारकडे वेळोवेळी केली होती. मात्र विवरण सादरीकरणास मुदतवाढ देण्याचा कसलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, 31 डिसेंबर ही विवरण सादर करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये कसलाही बदल केला जाणार नाही. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आतापर्यंत विवरण जास्त प्रमाणात सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याचा तपशील दिला नाही.
विवरण सादर करण्याच्या वेबसाईटमध्ये काही अडथळे आल्यानंतर या अगोदर विवरण सादर करण्यासाठी मुदतवाढ देऊन ती 31 डिसेंबर करण्यात आली होती. आता यामध्ये पुन्हा वाढ करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही वृत्त माध्यमांनी विवरण सादरीकरणासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र आता या विषयावर पडदा पडला आहे.