“काँग्रेसला दूर ठेऊन तिसरी आघाडी होऊ शकत नाही”; ममतांच्या भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नुकताच मुंबई दौरा पार पडला. त्यांच्या या दौऱ्यात भाजपला पर्याय म्हणून नवीन आघाडी निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भेटी गाठीचा कार्यक्रम त्यांनी केला. मात्र यात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पूर्णपणे डावलेले पाहायला मिळाले. यावरूनच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यूपीए कुठे? हा ममतांचा सवाल योग्य आहे. ममतांच्या मनात गृह आहे की काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की यूपीएला मजबूत केले नाही तर २०२४ (मिशन २०२४) मध्ये कसं लढणार. त्यासाठी काँग्रेसला सोबत घेऊन पुढे जावे लागेल. यूपीएच्या प्रमुख सोनिय गांधी यांच्या नेतृत्त्वावर कोणताही सवाल नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी, “वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. त्यांना भारतरत्नने का सन्मानित केले जात नाही. वीर सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत, “असे सांगत राऊतांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंनीही वारंवार हाच प्रश्न विचारला आहे. जर युपीए नाही तर एनडीएसुद्धा कुठे आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण २०२४ साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल त्याचा काय फायदा होईल याचा विचार करायला हवा. जी आघाडी आधीपासून आहे त्याला आणखी मजबूत करा असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर हे योग्य नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. यूपीए महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्याचेच प्रतिक आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, असेही राऊत म्हणाले. “या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपाला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि दोन वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येवून काम करु शकतो हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. आम्ही परत ममतांची भेट घेऊ. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल,” असे संजय राऊत म्हणाले.

“आदित्य ठाकरे आणि माझ्यासोबत ममतांची चर्चा झाली आहे. ममतांनी एक विचार घेऊन शरद पवारांशी संवाद साधला आहे. ममतांच्या बोलण्यातही दम आहे की यूपीएचे आज अस्तित्व नाही. ममतांचे म्हणणे सत्य आहे. कोणतीही आघाडी बनली तर ती काँग्रेससोबतच बनेल. अनेक राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे,” असे राऊत म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.