संगमनेर – शहरासह तालुक्यातील गावात चोऱ्या वाढल्या असून, अवैध धंद्यांना उत आल्याने पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरातून अनेक दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चैन स्नॅचिंग, बसस्थानक परिसरातून पाकीटमारी याचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याचे पहायला मिळते.
गुरुवारी निमज गावातील खंडोबा मंदिरात चोरट्यांनी दान पेटी फोडली, गावातील काही मोटारसायकल चोरीला गेल्या. शहरातून देखील रोज चोऱ्या, वाहन चोरी, चैन स्नॅचिंग, पाकीटमारीचे प्रमाण वाढले आहे. शहरात अवैध धंद्यांना उत आला असून, ठिकठिकाणी पेढ्या, क्लब, कत्तलखाने जोरात सुरू असल्याचे दिसून येते. तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ठिकठिकाणी गोवंश जनावरे पकडण्यात येतात.
ही जनावरे संगमनेर शहरात आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते जनावरे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पकडण्यात यशस्वी होतात. याचाच अर्थ शहरात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यांना कायमचे बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसते. शहरातील माधव टॉकीजच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये क्लब सुरू असल्याने विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचे काम क्लबचालक करत असल्याचे स्थानिक सांगत आहेत.
जोर्वे नाका आणि जोर्वे रस्त्यावर एका टपरीमध्ये गांजाचे सिगारेट मिळत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. याच भागात कसाई रात्रीचे नियोजन करतात. त्यामुळे त्या टपऱ्या बंद होणे गरजेचे आहे. शहरातील अवैध धंदे बंद करून चोरट्यांना पकडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.