अहमदाबाद :- संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आयएसआय’चे नेटवर्क गुजरात “एटीएस’ने उद्ध्वस्त केले असून “बीएसएफ’ची गोपनीय माहिती “आयएसआय’ला पुरवल्याबद्दल कच्छमधून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. निलेश बलिया असे या संशयिताचे नाव आहे.
निलेश बलिया याने “हनी ट्रॅप’मध्ये अडकून ही महत्वाची माहिती पुरवली असल्याचा आरोप आहे. त्याने पाकिस्तानमधील आदिती नावाच्या इंटरनेट प्रोफाइलशी संपर्क ठेवला होता. या प्रोफाइलवर “बीएसएफ’सी संबंधित महत्वाची माहिती पाठवण्यात आली होती आणि त्याबदल्यात पैसेही मिळवले गेले होते.
बलिया हा गेल्या 5 वर्षांपासून “बीएसएफ’च्या 59 बटालियनच्या भुजमधील मुख्यालयातील विद्युत विभागातील शिपाई आहे. यावर्षी जानेवारीमध्ये त्याने पाकिस्तानातील आदिती तिवारी या एजंटशी व्हॉटस ऍपच्या माध्यमातून संपर्क निर्माण केला होता.
आपण “बीएसएफ’मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर असल्याचे त्याने आदितीला सांगितले होते. मोठा मोबदला मिळण्याच्या आमिषाने त्याने आदितीसाठी हेरगिरी करण्याचे मान्य केले होते, असे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.