कात्रज – अनलॉक 5चा टप्पा सुरू झाला आहे. हॉटेल, चित्रपटगृह सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. परंतु, राज्यभरात बंद बसलेली प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी अद्यापही बंद आहेत. दि. 2 ते 8 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह आहे. यानिमित्त अनेक पर्यटक कात्रज येथील स्व.राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात येत असतात. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून प्राणिसंग्रहालय बंद आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. मात्र, अनलॉकमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु, बालचमूंसह पर्यटकांसाठी आकर्षण असलेले प्राणिसंग्रहालय सुरू करण्याबाबत मात्र सरकार अद्यापही उदासीन दिसत आहे.
राज्यातील मोठ्या प्राणिसंग्रहालयात गणती होत असलेल्या कात्रज येथील स्व.राजीव गांधी वन्यजीव संशोधन व प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबट्या, पांढरा हत्ती, शेकरू, किंग कोब्रा यासह 53 प्रजातीतील 450 विविध पशुपक्ष्यांसह प्राणी आहेत.
राज्यभरातून पुण्यात आलेला पर्यटक या प्राणिसंग्रहालयास भेट देतोच. परंतु, हे प्राणिसंग्रहालय बंद असल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तिकीट विक्रीतून मिळणारा लाखोंचा महसूल यामुळे बुडत आहे, यामुळे प्राणिसंग्रहालये सुरू करण्याबाबत निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
प्राणिसंग्रहालय उघडण्याबाबत राज्य शासनाकडून जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत बंदच ठेवावे लागणार आहे. करोना विषाणू प्रादुर्भावामुळे पुण्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजून तरी सारे अवघडच आहे.
– डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व.राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
कात्रज प्राणिसंग्रहालयाविषयी…
दिवसाला 5 ते 7 हजार पर्यटक भेट देतात
वर्षाला 17 ते 18 लाख पर्यटक
सुट्टी व पर्यटन काळातचं संग्रहालय बंद
भारतीय वन्यजीव सप्ताहातही बंद
लॉकडाऊनमुळे 2.50 कोटींचा फटका