देशाच्या राष्ट्रपतीपदावर एका आदिवासी महिलेची वर्णी लागल्याचा आनंद देशभरात साजरा करण्यात आला. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर मूळ प्रवाहापासून दूर राहिलेल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या प्रगतीचा मार्ग साधता येईल, यासाठी राष्टपतीपदावर आदिवासी महिलेची झालेली नेमणूक प्रेरणादायी ठरेल असे विचार देखील मांडण्यात आले. मात्र देशाच्या महामहिम राष्ट्र्पती आदिवासी समाजातील असताना व एक महिला असतानाच एका आदिवासी महिलेवर एका उच्चशिक्षित महिलेनं केलेल्या छळवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे आपण समाज म्हणून खरंच प्रगती केली आहे की सर्वकाही केवळ दिखाव्यासाठी केलं जातंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ( sima patra news )
घरकाम करणाऱ्या स्त्रिया, वॉचमन, सफाई कर्मचारी अशी अनेक कामं व ती कामं करणाऱ्यांना आजही समाजामध्ये कमी दर्जाचं मानलं जात. शिक्षणामुळे विचारांच्या कक्षा वृंदावून असे भेदाभेद मागे पडतील असा सामान्य समज असताना प्रत्यक्षात मात्र गंगा उलटीच वाहताना दिसतेय. सुनीता या आदिवासी महिलेवर अत्याचार करणारी महिला केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची पदाधिकारी आहे तर तिचा पती माजी आयएएस अधिकारी आहे. विकृतीचा कळस म्हणजे या महिलेवर आपल्या पत्नीकडून तब्बल आठ वर्षांपासून अत्याचार सुरु असताना माजी आयएएस अधिकारी असलेला पती महेश्वर पात्रा याबाबत कधी ब्र शब्द काढण्यासही धजला नाही.
मॅडमने (सीमा पात्रा) फरशीवरील लघवी जिभेने चाटायला लावणे, टॉयलेट जिभेने चाटून साफ करण्याची शिक्षा देणे, अंगावर चटके देणे असे ऐकूनही अंगावर काटा आणणारे प्रकार सुनीताने आपल्यासोबत घडल्याचं सांगितलंय. सैतानालाही लाजवेल असे अत्याचार करणाऱ्या आपल्या आईविरोधात अखेर सीमा व महेश्वर पात्रा यांचा मुलगा आयुष्यमानने पोलिसांत तक्रार केली. मुलाने आपला भांडाफोड केल्यानंतर चवताळलेल्या सीमा पात्राने आपला मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा कांगावा करत त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले. ( sima patra news )
महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. भाजपने देखील तिची हकालपट्टी केली आहे. पीडित सुनीताला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सुनीताने एका वृत्तसंस्थेशी बोलताना, आपण माझ्यासोबत जे-जे घडलं असल्याचं ऐकलं आहे, ते सर्व खरं असल्याचं म्हंटलंय. मॅडम (सीमा पात्रा) आपल्याला वारंवार मारहाण करीत असल्याचं देखील सुनीता सांगते.