भारतात गुन्हे आणि दहशतवादही वाढला असल्याचा दिला इशारा
वॉशिंग्टन: करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरीकांना विदेशात प्रवास करण्यास कडक निर्बंध लागू केले होते. पण त्यांनी ते आता मागे घेतले आहेत. तथापि अमेरिकन नागरीकांनी चीन, भारतासह अन्य 50 देशांत प्रवास न करण्याचा इशारा मात्र कायम ठेवला आहे.
करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरीकांसाठी विदेश प्रवासाला बंदी घालणारा क्रमांक चार पातळीवरील निर्बंध लागू केले होते. 19 मार्चला हे निर्बंध लागू करण्यात आले होंते.
भारतात करोनाबरोबरच गुन्हे आणि दहशतवादही वाढला असल्याने भारतात जाणे सुरक्षित नाही असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने आपल्या नागरीकांना उद्देशून नमूद केले आहे. भारतात जाणाऱ्या अमेरिकन नागरीकांना सीमा बंदी, विमानतळ बंदी, असे निर्बंध लागू केले जाऊ शकतात. तसेच घरातच राहण्याच्याही सुचना केल्या जाऊ शकतात, तसेच भारतात करोनाप्रसारामुळे अन्यही काही निर्बंध लागू केले जाऊ शकतात त्यामुळे भारतात सध्या जाणे धोकादायक आहे असे अमेरिकेने आपल्या नागरीकांना उद्देशून नमूद केले आहे.
अमेरिकेचे कौन्सिलर अफेअर्स विभागाचे सहायक सेक्रेटरी कार्ल रिश्च यांनी सांगितले की, अमेरिकेने आरोग्याच्या दृष्टीने लागू केलेली चार क्रमांकाच्या पातळीची धोक्याची सूचना मागे घेतली आहे. त्यामुळे आता विदेशातील प्रवासाच्या संबंधातील पुर्वीच्यात सवलती आणि नियम लागू केले जातील. जगातील अन्य देशांनी करोनाच्या संबंधातील सुरक्षेच्या अनेक उपाययोजना केल्याने आता आरोग्य विषयक धोका न राहिलेल्या देशांमध्ये अमेरिकन नागरीकांना मुक्त प्रवास करता येईल.
पण चीन, भारत आणि अन्य 50 देशांत प्रवास करण्यावरील धोक्याचा इशारा मात्र कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान युरोपिय संघाने आपल्या नागरीकांना अमेरिकेत प्रवास करण्यावरील बंदी मात्र कायम ठेवली आहे. तसेच अमेरिकेतून ब्रिटन मध्ये येणाऱ्या नागरीकांना मात्र चौदा दिवस क्वारंटाईन ठेवण्याची तरतूद ब्रिटनने कायम ठेवली आहे.