मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई  – राज्य सरकारच्या प्रतिष्ठेसाठी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 45 वर्षीय मनसुख हे रेती बंदर येथील खाडीत मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली ही बाब अजून स्पष्ट झालेली नाही. अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी स्फोटके भरलेली जी गाडी सापडली होती ती त्यांच्याच ताब्यात होती असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदवली होती.

त्यावर बोलताना राऊत म्हणाले की मनसुख यांचा मृत्यू धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. स्फोटके प्रकरणात ते महत्वाचे साक्षीदार होते.त्यामुळे त्यांचा मृत्यू अधिक चिंताजनक आहे. सरकारला दोष देण्यासाठी या मृत्यूचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसेच महाविकास आघाडीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी त्यांच्या मृत्यूचे गुढ लवकरात लवकर उकलणे आवश्‍यक ठरले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपने हे प्रकरण एनआयए कडे सुपुर्त करण्याची मागणी केली आहे त्याविषयी बोलताना ते म्हणाले की एनआयए कडे तपास सुपुर्त केला की लगेच त्याचा निकाल लागेल असे खात्रीने सांगता येत नाही. मुंबई पोलिसांच्या एटीएसकडे याचा तपास सोपवण्यात आला आहे त्यांच्यावर आपण विश्‍वास ठेवला पाहिजे असे ते म्हणाले. दरम्यान या मृत्यू प्रकरणाची विद्यमान न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली पाहिजे अशी मागणी मनसे पक्षाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.