सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेत गेल्या साडेसात वर्षात चुकीच्या पध्दतीने झालेल्या कारभाराची श्वेतप्रत्रिका काढून चुकीच्या पध्दतीने कारभार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे व शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील यांनी दिला. शिक्षक बॅंकेत सभासद हिताला प्राधान्य देणार असून कोणावरही सुडबध्दीने कारवाई करण्यात येणार नाही. निवडणुकीत सभासदांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता सभासद परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून करण्यावर आमचा भर राहील, असे श्री. शिंदे व श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षक बॅंकेत 21 पैकी 17 जागा मिळवत सभासद परिवर्तन पॅनेलने बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर उदय शिंदे, बळवंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे उपस्थित होते. “”बॅंकेचा नावलौकिक वाढवण्यावर सभासद परिवर्तन पॅनेलचा भर राहणार आहे. बॅंकेचा कारभार करताना संघटनाऐवजी पॅनेल म्हणून कार्यवाही करणार आहे.
संघटना बॅंकेबाहेर ठेवून सभासदहिताचे काम होईल. संघटना, जातपात यापलीकडे जाऊन कारभार करण्यावर भर राहील. गेल्या साडेसात वर्षात सत्ताधाऱ्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेत अनागोंदी कारभार केला. या कारभाराचा फटका सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत बसला.”असे उदय शिंदे व बलवंत पाटील यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपूर्वी सर्व संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते निवडी जाहीर करण्यात आल्या. पॅनेलच्या संमतीने या निवडी झाल्या असून कोणीही नाराज नाही. बॅंकेतील अनावश्यक खर्च टाळण्यावर भर देणार असून नोकरभरती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. दोन शिफ्टमध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिंदे व पाटील यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला गोपनीय
प्राथमिक शिक्षक बॅंकेत सभासद परिवर्तन पॅनेलचा आगामी रणनितीबाबत फॉर्म्युला उदय शिंदे, बलवंत पाटील, संभाजीराव थोरात, दीपक भुजबळ या चौघांमध्ये ठरला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकाल काय असणार याचे गुपित या फॉर्म्युल्यात असून चौघांव्यतिरिक्त कोणालाही तो माहित नसल्याची माहिती उदय शिंदे व बलवंत पाटील यांनी दिली. गोपनीय फॉर्म्युल्यामुळे पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल नेमका किती असणार हेही गुपितच राहिले आहे.
विरोधी संचालक संपर्कात असल्याचा दावा
शिक्षक बॅंकेत सभासद परिवर्तन पॅनेलचे 17 संचालक निवडून आले असून विरोधी गटातील शहाजी खाडे यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. विरोधी गटातील संचालक सभासद परिवर्तन पॅनेलच्या संपर्कात आहेत. बॅंकेत एकविचाराने काम करण्यावर आमचा भर राहणार असल्याची माहिती बलवंत पाटील यांनी यावेळी दिली.