टोकियो – जपानमधील टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी एकूण पाच हजारांवर पदके तयार करण्यात आली आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणातील छोटे सुटे भाग रिसयाकल करून त्यातील सोने व चांदीचा वापर पदके तयार करण्यासाठी आला आहे. त्यासाठी असे वापरून टाकून दिलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे दोन वर्षे जमा करण्यात येत होती.
जपानमधील शासकीय यंत्रणेने गेल्या दोन वर्षात सुमारे 72,000 टन ई-कचरा जमा केला.
त्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप अशा वस्तूंचा समावेश होता. एनटीटी डोकोमो या जपानमधील मोबाईल फोन सेवा देणाऱ्या आघाडीच्या कंपनीने वापरातून बाद झालेले, बिघडल्याने टाकून दिलेले सुमारे साठ लाख मोबाईल जमा केले.
नंतर अतिशय चिकाटीने काम करून या मोबाईलमधील सुटे भाग वेगळे करण्यात आले व ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यापूर्वी त्यामध्ये असलेले मौल्यवान धातून गाळून घेण्यात आले. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून 32 किलो सोने, 3,500 किलो चांदी आणि 2,200 किलो ब्राँझ मिळवण्यात आले.
टोकियो ऑलिंपिकमधील पदकांचे डिझाईन जुनिची कावान्शी यांनी केले असून खेळाडूंमधील उर्जा आणि बहुविधता पदकांच्या डिझाईनमधून दाखवण्यात आलेली आहे. पदकांसाठी रिबन ही रिसायकल केलेल्या पॉलिस्टर फायबरपासून बनवण्यात आलेली आहे.
पदकांचा व्यास 85 मिमी म्हणजे साडेआठ सेंटीमीटर आहे. पदकाची जाडी 12.1 मिलीमीटर आहे. पदकाच्या मागील बाजूस ग्रीसमधील विजयदेवता निकचे चित्र आहे.
सुवर्णपदकाचे वजन 556 ग्रॅम असून त्यामध्ये 1 टक्का सोने 92.5 टक्के चांदी आणि 6.5 टक्के तांबे आहे.
रौप्य पदकाचे वजन 550 ग्रॅम असून त्यामध्ये 92.5 टक्के चांदी आणि 7.5 टक्के तांबे आहे.
कांस्य पदकामध्ये 97 टक्के तांबे, 2.5 टक्के जस्त आणि 0.5 टक्के टिन आहे.
पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंव्यतिरिक्त स्पर्धेतील एक ते आठ क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र (ऑलिंपिक डिप्लोमा) आणइ सहभागाचे पदक दिले जाते.
1904 पासून पदके देण्यास प्रारंभ
1908 मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिंपिकमधील पदकांचा व्यास 33 मिलीमटर तर वजन फक्त 21 ग्रॅम होते. अमेरिकेतील सेंट लुईस येथे 1904 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदके देण्यात आली. 1896 आणि 1900 मध्ये झालेल्या ऑलिंपकमधील विजेत्यांना पूर्वलक्षी प्रभावाने ही पदके देण्यात आली.
प्राचीन काळात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये विजेत्यांना पदके दिली जात नसत. त्याऐवजी ग्रीक देवता झीअसच्या सन्मानार्थ ऑलिव्हच्या पानांचे चक्र त्यांच्या डोक्यावर ठेवले जात असे.
आधुनिक काळातील पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा ग्रीसमधील अथेन्स येथे 1896 मध्ये झाल्या. त्यावेळी पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंना चांदीचे पदक आणि ऑलिव्हची फांदी देण्यात आली होती. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या खेळाडूंना अनुक्रमे तांब्याची आणि ब्राँझची पदके देण्यात आली होती. 1012 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये देण्यात आलेल्या सुवर्णपदकांमध्ये 100 टक्के अस्सल सोने होते. त्यानंतर अशी पदके देण्यात आलेली नाहीत.