विक्री वाढल्यामुळे शेअर निर्देशांकात घट

मुंबई – शेअरबाजार निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शुक्रवारी निर्देशांकांत घट झाली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 143 अंकांनी म्हणजे 0.40 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36,594 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी म्हणजे 0.42 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 10,768 अंकावर बंद झाला.

आज बॅंकिंग, ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू, धातू क्षेत्राचे निर्देशांक सव्वा दोन टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. तर ऊर्जा, दूरसंचार, आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक वाढले. देशात आणि जागतिक पातळीवर करोना व्हायरस रूग्णांची संख्या वाढत असूनही निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. रुपयाच्या मूल्यात 21 पैशांची घट होऊन रुपयाचा भाव 75.20 रुपये प्रति डॉलर झाला.

दरम्यान, पंजाब नॅशनल बॅंकेने दिवाण हाऊसिंग फायनान्सच्या खात्यामध्ये 3,688 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. या घडामोडीचा परिणाम आज या बॅंकेच्या शेअरवर झाला. या बॅंकेचे शेअर शुक्रवारी पाच टक्‍क्‍यांनी कोसळले. या गैरव्यवहारापोटी बॅंकेने 1246 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.