मुंबई – राम मंदीराचे तुम्ही मालक नाहीत आणि राम केवळ तुमचे नाहीत. त्यामुळे, राम मंदीराचे उद्घाटन करायचे असेल तर राष्ट्रपती दलित महिला आहेत, त्यांच्या हस्ते करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, नवीन पार्लमेंटच्या पुजेला एकाही महिलेला निमंत्रण दिले नाही. देशातून जातीवाद कधी संपणार? आमंत्रणाचे काय नाटक आहे? आम्ही रामाचे दर्शन घ्यायला जाणार, बघू आम्हाला कोण थांबवते ते, या देशात आता रामाच्या दर्शनापासून आम्हाला वंचित ठेवू शकत नाही. आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असे मत यावेळी बोलताना आव्हाडांनी व्यक्त केले आहे.
लोकसभेच्या जागा वाटपावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल आणि जागावाटपाबाबत चर्चा करतील. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करुन घ्यावे ही विनंती असल्याची भूमिका आव्हाडांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर आव्हाड म्हणाले की, दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसे युतीत शामिल होईल का नाही याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी दुसऱ्याच्या घरात डोकवत नाही असं परखड मत यावेळी आव्हाडांनी व्यक्त केलं.