पुणे – पवित्र रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठेत मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विविध पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. पण, खरेदीचा हा उत्साह कायम आहे. तर, रमजान ईदला नमाज अदा करण्यासाठी टोप्यांची उलाढालदेखील वाढली आहे. यात विविध रंग आणि नक्षीदार कलाकुसर आहे.
रमजान महिन्यात पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास पाळले जातात. या महिन्यामध्ये रोजे असल्याने सुका मेवा, मिठाई, फळे, खजूर, यांची मागणी वाढली आहे. पुण्यातील बाजारात यंदाही जवळपास 50 हून अधिक प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत. यात सौदी अरेबिया, रसगुला खजूर, केमिया, कॅडबरी, टोनिसिया, मेवावाला, ट्रे खजूर, डाली खजूर, अंगुरी, इराणी, बदाम, रोतब, खनिजी, इराकी खजुरांचा समावेश आहे.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा गोड पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नवीन कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
अत्तराचा दरवळ
रमजाननिमित्त नवीन कपड्यांसोबत अत्तर लावून ईदची विशेष नमाज अदा केली जाते. यामुळे विविध प्रकारचे अत्तर बाजारात आले आहेत. बॉडी कोरस, थाउजंट फ्लावर, बॉडीकोरस, हुदा, गुलिस्ता, दाना अरब, मवाल, कॉकटेल या अत्तरांचीही मागणी वाढलेली आहे. भारतीय बनावटीसह विदेशी बनावटीच्या अत्तरांची मागणीही वाढत आहे. तसेच डोळ्यांत घालण्यासाठी सुरम्यालाही चांगली मागणी आहे.
गर्दी आणखी वाढणार
रमजान ईद दि. 22 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे आणखी 12 दिवस आहेत. ईद जवळ येताच बाजारात गर्दी आणि उलाढाल वाढणार आहे. पुढील आठवड्यातील शनिवार-रविवारी कापड खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतील.
सध्या सर्वत्र महागाई आहे. मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरांत आम्ही सुविधा पुरवतो. रमजान काळात ग्राहकांनी पदार्थांची चव घेऊनच खरेदी करावी. इफ्तार पार्टी आयोजित असलेल्या ठिकाणी ताटातील सर्व पदार्थ संपले पाहिजेत. अन्न वाया जाऊ देऊ नये, असे आम्ही सर्वांना आवाहन करतो.
– नुसरत शेख, शालिमार केटरर्स, पुणे कॅम्प