पिंपरी – लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर आलेली असताना राज्यातील भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा फार्म्यूला कसा असेल, याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकिट द्यावे लागेल, असे वक्तव्य पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृतवाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात जून 2022 मध्ये शिवसेनेते उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा करून मुख्यमंत्री पद मिळविले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस बदलत आहे. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीने आपली “वज्रमूठ” आणखी घट्ट करण्याचा इरादा केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला समन्वय दिसून येत आहे. या नेत्यांच्या समन्वयामुळे महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविताना अडचणी येतील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा प्राथमिक फार्म्यूला ठरला असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून विधानसभेला अवघ्या 40 ते 50 जागा सोडण्यात येतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच विधान केले होते. या विधानामुळे शिंदे गटात अस्वस्थता असतानाच आता पालकमंत्री पाटील यांनी दोन दिवसापूर्वी एका वृतवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकिट द्यावे लागेल, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून तीव्र इच्छूक असलेले माजी खासदार आढळराव-पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता असून त्यांचा पत्ता कट होतोयं की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच कोल्हे हे भाजपकडून लढणार की शिवसेनेकडून लढणार असा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा कोल्हे यांना विचारले जाईल, आणि आढळराव यांना समजाविले जाईल, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. तसेच लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या जागा वाटपाचे गणित ठरविण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार
शिरूर लोकसभा मतदार संघाचे तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी 2019 मध्ये पराभव करून ते जायंट किलर ठरले. डॉ. कोल्हे हे अभिनेते असल्याने त्यांच्या स्टारडमचा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पुरेपुर फायदा करून घेतला. मात्र, कोल्हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. कोल्हे हे भाजपच्या जवळ गेले आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.