नवी दिल्ली -देशाच्या नव्या संरक्षण दलप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया केंद्र सरकारकडून लवकरच सुरू केली जाण्याची शक्यता आहे. त्या पदासाठी लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यामुळे नव्या संरक्षण दलप्रमुखांची नियुक्ती अपरिहार्य बनली आहे. ती नियुक्ती मार्गी लावण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करेल. त्यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
त्या समितीच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया होईल. संरक्षण दलप्रमुख म्हणून संभाव्य उमेदवारांची नावे प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठवली जातील. त्यांच्या मंजुरीनंतर ती नावे विचारासाठी आणि नव्या संरक्षण दलप्रमुखांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीकडे पाठवली जातील.
तूर्त, नवे संरक्षण दलप्रमुख म्हणून नरवणे यांचे नाव निश्चित होण्याची सर्वांधिक शक्यता आहे. हवाई दलप्रमुख व्ही.आर.चौधरी आणि नौदल प्रमुख आर.हरीकुमार यांच्यापेक्षा सेवाकाळाचा विचार करता नरवणे वरिष्ठ आहेत. ते पुढील वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. त्याशिवाय, कामगिरी पाहता नरवणे यांनाच संरक्षण दलप्रमुख बनवणे योग्य ठरेल, असे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचेही मत आहे.