पिंपरी – गेल्या 11 दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. 24 ऑगस्ट रोजी स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 23 इतकी होती. तर आजच्या तारखेला 45 स्वाइन फ्लू बाधितांची संख्या आहे. तर आत्तापर्यंत एक हजार 970 जणांनी स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस घेतली आहे.
करोना आणि स्वाइन फ्लू हे दोन संसर्गजन्य आजार असून त्यांच्या लक्षणातही बरेच साम्य आहे. करोनाचा उद्रेक झाल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे करोना बाधितांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहे. सध्या करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत असला तरी सरासरी 80 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. मात्र अनेकजणांना सर्दी खोकला आणि ताप असूनही ते स्वतःच व्हायल फिव्हर असल्याची समजूत करून घेत घरीच उपचार घेत आहेत. यामुळे करोना बाधितांची संख्या जादा असल्याची शक्यता आहे.
एकीकडे करोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्वाइन फ्लूने या आजारानेही उचल खाल्ली आहे. 24 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले होते. त्यावेळी शहरात 23 रुग्ण होते. तर दोन स्वाइन फ्लू संशयितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
त्यानंतर आणखी एका संशयिताचा मृत्यू झाल्याने हा आकडा गेल्या दोन महिन्यात तीनवर गेला. गेल्या 11 दिवसांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सध्या स्वाइन फ्लूचे 45 संशयित रुग्ण आहेत. स्वाईन फ्लूपासून बचाव व्हावा, यासाठी महापालिकेने प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये गरोदर महिला, वैद्यकीय कर्मचारी आणि मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांना ही लस मोफत देण्यात येत आहे. आत्तापर्यंत एक हजार 582 गरोदर महिला, 303 विविध आजार असलेले रुग्ण आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करीत असलेल्या 85 जणांनी प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.