मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे करोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवार (दि. 24) पर्यंत पाच झाली आहे. नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे. अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीने गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा गावबंद ठेवून करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रयत्न केले आहेत. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी किराणा, दूध, तसेच मेडिकल आणि दवाखाने सुरू ठेवल्याची माहिती उपसरपंच सचिन हिंगे यांनी दिली.
आज गावठाण भागातील रुग्ण करोनाबाधित सापडले आहेत. हा परिसर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कन्टेन्मेंट झोन जाहीर केला असून, त्यांनी दिलेल्या आदेशाचे ग्रामस्थ पालन करीत असल्याचे सांगण्यात आले. तोंडाला मास्क न लावणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे सरपंच पवन हिले यांनी सांगितले.